केपीआयटी एमएसएलटीए एटीपी चॅलेंजर स्पर्धेत एकेरीत भारताच्या युकी भांब्री याला विजेतेपद

पुणे| एमएसएलटीए व पीएमडीटीए यांच्या तर्फे आयोजित चौथ्या 50000डॉलर +हॉस्पिटॅलिटी  केपीआयटी एमएसएलटीए एटीपी चॅलेंजर स्पर्धेत एकेरी गटात भारताच्या युकी भांब्री याने आपली विजयी मालिका कायम ठेवत रामकुमार रामनाथनचा 4-6, 6-3, 6-4 असा पराभव करून विजेतेपद संपादन केले. दुहेरीत बोस्नियाच्या टोमीस्लाव्ह ब्रेकीक व क्रोशियाच्या अॅन्ट पावीक यांनी आपापल्या प्रतिस्परध्यांचा पराभव करून विजेतेपद पटकावले.

एमएसएलटीए स्कुल ऑफ टेनिस, श्री शिवछ्त्रपती क्रीडा संकुल, म्हाळुंगे बालेवाडी येथे पार पडलेल्या या स्पर्धेत एकेरीत अंतिम फेरीच्या लढतीत जागतिक क्रमवारीत 137व्या क्रमांकावर असलेल्या भारताच्या युकी भांब्री याने आपला धडाका कायम जागतिक क्र.150 असलेल्या  भारताच्या रामकुमार रामनाथन याचा 4-6, 6-3, 6-4 असा संघर्षपूर्ण पराभव करून विजेतेपद संपादन केले.

2तास 2मिनिटे  झालेल्या या अतितटीच्या सामन्यात पहिल्या सेटमध्ये पहिल्याच गेममध्ये युकीने रामकुमारची सर्व्हिस भेदली व स्वतःची सर्व्हिस राखत 2-0अशी आघाडी घेतली. 4थ्या गेममध्ये रामकुमार याने कमबॅक करत युकीची सर्व्हिस भेदली व बरोबरी साधली. त्यानंतर दोन्ही खेळाडूंनी आपापल्या सर्व्हिस राखल्या व सामन्यात 4-4 अशी बरोबरी निर्माण झाली.

10व्या गेममध्ये रामकुमारने आपला खेळ उंचावत युकीची सर्व्हिस ब्रेक व हा सेट 6-4 असा जिंकून आघाडी घेतली. सामन्यात पिछाडीवर असलेल्या युकीने दुसऱ्या सेटमध्ये रामकुमारची तिसऱ्या गेममध्ये सर्व्हिस रोखली व स्वतः ची राखत 3-1 अशी आघाडी मिळवली.सामन्यात 5-3 अशी स्थिती असताना 9व्या गेममध्ये रामकुमारने डबल फॉल्ट केला व याचाच फायदा घेत युकीने आक्रमक खेळ करत रामकुमारची सर्व्हिस भेदली व हा सेट 6-3 अशा फरकाने जिंकून सामन्यातील आपले आव्हान कायम राखले.

तिसऱ्या व निर्णायक सेटमध्ये सुरुवातीला दोन्ही खेळाडूंनी सुरेख खेळ करत आपापल्या सर्व्हिस राखल्या व त्यामुळे सामन्यात 4-4 अशी बरोबरी निर्माण झाली. 10व्या गेममध्ये रामकुमारने डबल फॉल्ट केला व युकीने मिळालेल्या संधीचे सोने करत मॅचपॉइंट मिळवत त्याची सर्व्हिस ब्रेक करून विजेतेपदावर आपले नाव कोरले. या विजेतेपदामुळे युकी भांब्री जागतिक क्रमवारीत 120व्या स्थानी पोहोचला असून रामकुमार रामनाथन 137व्या क्रमांकावर पोहोचला आहे.

यावेळी युकी भांब्री म्हणाला की, पुणे माझ्यासाठी नेहमीच लकी ठरले आहे. आतापर्यंत पुण्यात मी अनेक स्पर्धा खेळलो आहे आणि येथे होणाऱ्या स्पर्धांचे यशस्वीरीत्या आयोजन केले जाते. हि स्पर्धा यशस्वीरीत्या आयोजित करण्यात स्पर्धा संयोजकांचा मोलाचा वाटा आहे.  केपीआयटी एमएसएलटीए एटीपी चॅलेंजर स्पर्धेचे हे सलग 4वर्षे आहे आणि पुढच्याही वर्षी या स्पर्धेत मला सहभागी व्हायला आवडेल.

दुहेरीत अंतिम फेरीच्या लढतीत बोस्नियाच्या टोमीस्लाव्ह ब्रेकीक याने क्रोशियाच्या अॅन्ट पावीकच्या साथीत स्पेनच्या पेद्रो मार्टिनेझ व ऍड्रियन मेनेनडेज मॅसिरास या जोडीचा टायब्रेकमध्ये 6-1, 7-6(7-5)असा पराभव करून विजेतेपद पटकावले.  1तास 13मिनिटे चाललेल्या या सामन्यात टोमीस्लाव्ह ब्रेकीक व अॅन्ट पावीक यांनी सुरेख सुरुवात करत पहिल्याच गेममध्ये पेद्रो मार्टिनेझ व ऍड्रियन मेनेनडेज मॅसिरास यांची सर्व्हिस ब्रेक केली.

त्यांनंतर दोन्ही खेळाडूंनी सयंमपूर्ण खेळी करत पाचव्या गेममध्ये पुन्हा पेद्रो मार्टिनेझ व ऍड्रियन मेनेनडेज मॅसिरास यांची सर्व्हिस ब्रेक केली व सामन्यात 4-1 अशी आघाडी घेतली. 7व्या गेममध्ये पेद्रो मार्टिनेझ व ऍड्रियन मेनेनडेज मॅसिरास यांनी 40-40असे गुण असताना डबल फॉल्ट केला व हा सेट 6-1 असा सहज जिंकून आघाडी घेतली.

दुसऱ्या सेटमध्ये दोन्ही जोडींनी जिगरबाज खेळाचे प्रदर्शन केले व सामन्यात आपापल्या सर्व्हिस राखल्या. त्यामुळे हा सेट टायब्रेकमध्ये गेला. टायब्रेकमध्ये 8व्या गेममध्ये  टोमीस्लाव्ह ब्रेकीक व अॅन्ट पावीक यांनी पेद्रो मार्टिनेझ व ऍड्रियन मेनेनडेज मॅसिरास यांची सर्व्हिस ब्रेक करून सामन्यात 5-3अशी आघाडी मिळवली. त्यांनंतर 12व्या गेममध्ये टोमीस्लाव्ह ब्रेकीक व अॅन्ट पावीक यांनी पेद्रो मार्टिनेझ व ऍड्रियन मेनेनडेज मॅसिरास यांची पुन्हा सर्व्हिस भेदली व सेट 7-6(7-5) असा जिंकून विजेतेपदावर शिक्कामोर्तब केले.

हि स्पर्धा जिंकल्यामुळे आम्हांला खूप आनंद झाला आहे. आम्ही गेली 7वर्ष दोघे सोबत खेळत आहोत. पहिला सेट सहज जिंकल्यानंतर दुसऱ्या सेटमध्ये आपल्या कामगिरीत सातत्य राखण्याचे आव्हान आमच्यासमोर होते.  दुसऱ्या सेटमध्ये मार्टिनेझ व ऍड्रियन यांनी कडवी झुंज दिली. पण या आव्हानाला सामोरे जात आम्ही हा सेट टायब्रेकमध्ये जिंकला.

स्पर्धेतील विजेत्या युकी भांब्री याला  7200डॉलर व 80एटीपी गुण, तर उपविजेत्या रामकुमार रामनाथन याला 4240डॉलर व 48 एटीपी गुण देण्यात आले. स्पर्धेचे पारितोषिक वितरण केपीआयटीचे चेअरमन रवी पंडित, केपीआयटीचे व्यवस्थापकीय संचालक किशोर पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी स्पर्धा संचालक व एमएसएलटीएचे मानद सचिव सुंदर अय्यर, पीएमडीटीएचे खजिनदार कौस्तुभ शहा आणि  एटीपी सुपरवायझर रॉजिरिओ सांतोस, अश्विन गिरमे, मिहीर दिवेकर, प्रवीण झिटे आदी मान्यवर उपस्थित होते.

स्पर्धेचा सविस्तर निकाल-एकेरी गट- अंतिम फेरी
युकी भांब्री(भारत,3) वि.वि.रामकुमार रामनाथन(भारत,4)4-6, 6-3, 6-4.