एकेकाळचा आयपीएलचा हिरो कसा झाला झिरो?

आयपीएलच्या ११ व्या मोसमाचा लिलाव २७ आणि २८ जानेवारी असे दोन दिवस बंगळुरूला पार पडला. या लिलावात अनेक खेळाडूंवर कोट्यवधींची बोली लागली तर अनेक खेळाडूंना त्यांच्या मूळ किमतीतच फ्रॅन्चायझींनी खरेदी केले. या लिलावात फ्रॅन्चायझींनी सर्वाधिक पसंती तरुण खेळाडूंना देताना अनुभवी खेळाडूंकडे मात्र दुर्लक्ष केलेले दिसले.

यात भारताचा अष्टपैलू खेळाडू आणि २०११ च्या विश्वचषकातील मालिकावीर ठरलेला युवराजला सिंगलाही किंग्स इलेव्हन पंजाबने त्याच्या मूळ किमतीत म्हणजेच २ कोटींमध्ये खरेदी केले. हाच युवराज २०१४ आणि २०१५ मध्ये आयपीएल लिलावातील सर्वाधिक महागडा खेळाडू ठरला होता.

२०१४ मध्ये त्याला रॉयल चॅलेंजर्स बंगलोरने १४ कोटीला खरेदी केले होते. तर २०१५ मध्ये हा विक्रम मोडत दिल्ली डेअरडेव्हिल्सने १६ कोटीची बोली लावत युवराजला संघात सामील करून घेतले होते.

युवराज मागील काही वर्षांपासून त्याच्या फॉर्मशी झगडत आहे. त्यामुळे त्याला आयपीएलमधेही गेल्या २-३ वर्षात खास काही करता आलेले नाही. तसेच गेल्या ५ वर्षात युवराजने ४ आयपीएल संघ बदलले आहेत.

युवराजच्या अशा खराब कामगिरीमुळे त्याला भारतीय संघातील स्थानही गमवावे लागले आहे आणि याच कारणामुळे युवराजला आयपीएल २०१८ च्या लिलावातही जास्त भाव मिळाला नाही.

असे आहेत युवराजचे गेल्या ५ वर्षातील आयपीएल संघ:

२०१४ – रॉयल चॅलेंजर्स बंगलोर (१४ कोटी)
२०१५ – दिल्ली डेअरडेव्हिल्स (१६ कोटी)
२०१६-२०१७ – सनरायझर्स हैद्राबाद (७ कोटी )
२०१८ – किंग्स इलेव्हन पंजाब (२ कोटी )

अशी आहे युवराजची मागील ४ आयपीएल मोसमातील कामगीरी:

२०१४: या वर्षी १४ सामन्यात खेळताना युवराजने ३४.१८ च्या सरासरीने ३७६ धावा केल्या होत्या. यात त्याने ३ अर्धशतके केली होती तर ८३ ही त्याची सर्वोच्च धावसंख्या होती. गोलंदाजी करताना त्याने ५ बळी घेतले होते.

२०१५: या वर्षात खेळताना युवराजने १४ सामन्यात १९.०७ च्या सरासरीने २१० धावा केल्या. यात त्याच्या २ अर्धशतकांचा समावेश आहे. या वर्षातील त्याची ५७ ही सर्वोच्च धावसंख्या होती. तसेच या वर्षात त्याला एकच बळी घेण्यात यश मिळाले होते.

२०१६: या वर्षीच्या सुरवातीच्या काही सामन्यांना युवराजला दुखापतीमुळे मुकावे लागले होते. दुखापतीनंतर त्याने खेळताना १० सामन्यात २६.२२च्या सरासरीने २३६ धावा केल्या होत्या. यातील एकही सामन्यात युवराजला अर्धशतकही करता आले नव्हते. ४४ धावा हि त्याची सर्वोच्च धावसंख्या होती. या वर्षात त्याने एकही बळी घेतला नव्हता. विशेष म्हणजे तो ज्या संघाकडून खेळत होता त्या सनरायझर्स हैदराबादने २०१६ ला विजेतेपद मिळवले होते.

२०१७: आयपीएलच्या या १० व्या मोसमात युवराज १२ सामने खेळला. यात त्याने २ अर्धशतकांसह २८ च्या सरासरीने २५२ धावा केल्या होत्या. नाबाद ७० धावा ही त्याची या वर्षातील सर्वोच्च धावसंख्या होती. त्याचबरोबर या वर्षातही गोलंदाजी करताना त्याने एकच बळी घेतला होता.

युवराजने आयपीएलच्या पहिल्या मोसमपासून(२००८ पासून) आत्तापर्यंत १२० आयपीएल सामने खेळले आहेत. यात त्याने १२ अर्धशतकांसह २५.६१ च्या सरासरीने २५८७ धावा केल्या आहेत. ८३ धावा ही त्याची सर्वोच्च धावसंख्या आहे. तसेच त्याने २९.२७ च्या सरासरीने ३६ बळी घेतले आहेत.