युवराज सिंगचा पुन्हा धमाका, पंजाबला सुपर ओव्हरमध्ये मिळवून दिला विजय

कोलकाता । भारतीय संघाबाहेर असलेला महान अष्टपैलू खेळाडू युवराज सिंगने सईद मुश्ताक अली ट्रॉफीमधील कामगिरीने निवड समितीला आपल्या नावाचा पुन्हा विचार करायला लावणारी कामगिरी केली आहे. आपल्या अष्टपैलु कामगिरीने त्याने पंजाब संघाला कर्नाटक संघावर थरारक विजय मिळवून दिला आहे.

नाणेफेक जिंकून पंजाब संघाचा कर्णधार असलेल्या युवराज सिंगने विनय कुमारच्या कर्नाटक संघाला प्रथम फलंदाजीला पाचारण केले. अनिरुद्ध जोशी (४०*) आणि सी गौतम (३६) यांच्या खेळीच्या जोरावर कर्नाटकने २० षटकांत ७ बाद १५८ धावा केल्या.

कर्णधार युवराजने स्वतः १३वे षटक टाकले. परंतु हे षटक पंजाबसाठी चांगलेच महाग ठरले. यात तब्बल १७ धावा कर्नाटक संघाने जमवल्या. हरभजन सिंगलाही विशेष चमक दाखवता आली नाही आणि त्याने ४ षटकांत २७ धावा देत १ विकेट घेतली.

परंतु क्षेत्ररक्षणात युवराजने कमाल करत सी गौतम (३६) आणि स्टुअर्ट बिन्नी (२) यांचे प्रेक्षणीय झेल घेतले.

त्यानंतर १५९ धावांचा पाठलाग करताना मनन व्होरा ९ धावांवर बाद झाल्यावर कर्णधार युवराजने हरभजनला तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला पाठवले. त्यानेही आपल्या कर्णधाराची निराशा न करता १९ चेंडूत ३३ धावा केल्या. सलामीवीर मनदीप सिंगने ४५ तर युवराजने २५ चेंडूत २९ धावा केल्या. अन्य फलंदाजाना विशेष चमक दाखवता न आल्यामुळे पंजाबचा डावही २० षटकांत ९ बाद १५८ धावांवर संपला.

सामना वन ओव्हर एलिमिनटर अर्थात सुपर ओव्हरमध्ये गेल्यावर युवराजने एक चौकार तर मनदीप सिंगने षटकार खेचल्यामुळे पंजाबने १५ धावा केल्या. याला उत्तर देताना कर्नाटकला केवळ ११ धावा करता आल्यामुळे पंजाबने ४ धावांनी विजय मिळवला.