पंजाबच्या विजयात युवराज सिंग चमकला, गंभीरचे अर्धशतक व्यर्थ

दिल्ली । भारतीय संघात परतण्यासाठी आतुर असलेल्या युवराज सिंग आणि गौतम गंभीरने आज खणखणीत अर्धशतकी खेळी केल्या. ह्या दोन्ही खेळाडूंची दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी निवड झालेल्या संघात कोणत्याही प्रकारात निवड झाली नाही.

सईद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये आज पंजाब विरुद्ध दिल्ली सामन्यात दिल्ली संघाने प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. पंजाबकडून सलामीवीर मनन व्होराने ७४ धावांची खेळी केली तर सध्या भारतीय संघाबाहेर असलेल्या युवराज सिंगने ४० चेंडूत नाबाद ५० धावांची खेळी केली. त्यात युवराजच्या ४ चौकार आणि १ षटकाराचा समावेश होता.

या दोघांच्या अर्धशतकाच्या जोरावर पंजाबने निर्धारित २० षटकांत ३ बाद १७० धावा केल्या.

दिल्लीकडून सलामीवीर गौतम गंभीरने ५४ चेंडूत ६६ धावा केल्या तर रिषभ पंतने २५ चेंडूत ३८ धावा केल्या. परंतु दिल्ली संघाला २ धावांनी पराभवाला सामोरे जावे लागले.

या दोन्ही खेळाडूंनी जरी या सामन्यात अर्धशतकी खेळी केल्या असल्या तरी त्याच्या टी२० कारकिर्दीतील संथ खेळ्यांपैकी ह्या खेळ्या समजल्या जातात.

चॅम्पियन्स ट्रॉफीनंतर युवराज सिंग केवळ दोन सामने खेळला असून यापूर्वी ऑक्टोबर महिन्यात तो एक रणजी सामना खेळला होता परंतु त्यातही त्याला मोठी धावसंख्या उभारता आली नव्हती. दिल्लीकर गौतम गंभीर मात्र देशांतर्गत क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी करत असून रणजी ट्रॉफीपाठोपाठ आता सईद मुश्ताक अली ट्रॉफीमध्येही त्याने आपली चमक दाखवली आहे.