‘युवराज’ म्हणजे…

-निमेश वहाळकर

युवराजच्या वर्ल्डकप २०११ मधील योगदानाची, २००७ च्या टी-२० वर्ल्डकमधल्या त्या एका षटकांतील सहा षटकारांची आज खूप चर्चा होते आहे. परंतु, युवराज सिंगची कारकीर्द तेवढ्यापुरती मर्यादित नाही. तिचं मूल्यमापन करायचंच असेल, तर २००२ मधील नॅटवेस्ट सिरीजपासून करावं लागतं. आयपीएल आणि टी-२० क्रिकेटमध्ये रमणाऱ्या कितीजणांना आज ती मॅच आठवेल सांगता येत नाही. लॉर्ड्सवर त्यावेळच्या सव्वातीनशे धावांच्या अशक्यप्राय आव्हानाचा पाठलाग करताना भारताची निम्मी फळी गारद झाली होती. मुख्य म्हणजे सचिन, गांगुली, द्रविड बाद झाले होते. आपल्यापैकी अनेकांनी सवयीप्रमाणे टीव्ही बंदही केले असतील.

अशावेळी आंतरराष्ट्रीय कारकिर्द सुरू होऊन दोन वर्षंदेखील न झालेला युवराज आणि सात-आठ महिनेही न झालेल्या मोहम्मद कैफने खिंड लढवत विजय मिळवून दिला आणि क्रिकेटविश्वाला आश्चर्याचा धक्का दिला. केवळ एक सामना जिंकला एवढंच त्या घटनेचं महत्त्व नव्हतं. परकीय भूमीवर तीनशेहून अधिक धावांचा पाठलाग करून, त्यातही सचिन-सौरव-राहुलसारखे वर्ल्डक्लास फलंदाज बाद होऊनसुद्धा, आम्ही जिंकू शकतो, हे टीम इंडियानं तेव्हा जगाला दाखवून दिलं.

‘त्या काळातले शंभर रुपये म्हणजे आजच्या काळातले दहा हजार रूपये’ वगैरे जसं ज्येष्ठ मंडळी सांगतात, तसंच २००२ मधल्या ३२५ धावा म्हणजे आजच्या काळातल्या ३७५ धावा आहेत. आपल्याकडे अनेक लढायांचे इतिहास वाचताना सेनापती धारातीर्थी पडला म्हणून सैनिकांनी शस्त्रास्त्रं खाली टाकून रणांगणातून पळ काढल्याचे संदर्भ सापडतात.

सचिन तेंडुलकर बाद झाल्यावर आपल्या क्रिकेट संघाची अवस्था अनेकदा तशीच व्हायची. ‘अभेद्य भिंत’ अर्थात द्रविड बाद झाला की मग उरल्यासुरल्या आशाही संपून जायच्या. पराभव ही केवळ एक औपचारिकता उरायची. प्रेक्षकही मग कंटाळून टीव्ही वगैरे बंद करून टाकायचे. युवराज, कैफ लॉर्ड्सवर या अशा सगळ्या परिस्थितीत अनुक्रमे सहाव्या आणि सातव्या स्थानावर फलंदाजीला उतरले, योद्ध्याप्रमाणे शत्रूसैन्याचे वार झेलत उभे राहिले आणि विजयीसुद्धा झाले.

युवराज म्हणजे संघर्ष, युवराज म्हणजे लढाई, युवराज म्हणजे न खचता शेवटपर्यंत खंबीरपणे उभं राहणं, युवराज म्हणजे आत्मविश्वास हे समीकरण तेव्हापासून सुरू झालं आणि मग पुढे अधिकाधिक दृढ होत गेलं. भारतीय क्रिकेट संघातील युवराज, सेहवाग, गंभीर, झहीर, हरभजन हे खेळाडू साधारण एकाच पिढीतले. हे लोक ना धड सचिन, गांगुली, द्रविड, कुंबळेच्या पिढीतले आणि ना कोहली, रोहितच्या.

२००० ते २००५ या काळात पदार्पण करणाऱ्या या पिढीतील दोन-तीन जणांचा अपवाद वगळता बहुतेकांच्या कारकीर्दीची अखेर मैदानाबाहेर झाली. एकेकाळी मैदान गाजवणाऱ्या या मंडळींना अखेरच्या काळात संघात स्थान मिळवण्यासाठी झगडावं लागलं आणि मग मैदानाबाहेरच निवृत्तीची घोषणा करावी लागली.

महेंद्रसिंग धोनीही तसा याच पिढीच्या जवळचा पण तो संघात स्थिरावला तोच टी-२० चा कर्णधार बनला आणि टी-२० चा पहिला वर्ल्डकप जिंकून मग त्याचं स्थान पुढे वेगळ्याच उंचीवर जाऊन पोहोचलं. त्यामुळे तो एक अपवाद राहतो, झहीर खानच्या निवृत्तीचं नेमकं काही आठवत नाही पण बाकी सगळ्यांचं हे असंच झालं.

सचिनची पिढी बाजूला झाली आणि कोहली, रोहित शर्मा, धवन, अश्विन, जडेजा इत्यादींच्या संघात सेहवाग, युवराज, हरभजन मिसफिट ठरताना दिसू लागले. धावांसाठी, विकेटसाठी झगडताना दिसू लागले. एकीकडे कोहलीसारखे खेळाडू नवनव्या विक्रमांना गवसणी घालत असताना दुसरीकडे हे जुनेजाणते, अनुभवी खेळाडू मात्र बाजूला फेकले गेले.

युवराजच्या कारकिर्दीचीही काहीशी अशीच अखेर झाली असली तरी त्याला त्याने कर्करोगाशी दिलेल्या लढ्याची किनार आहे. ज्या रोगाचं नाव ऐकूनही माणसं मुळापासून कोसळून पडतात, अशा कर्करोगाशी यशस्वीपणे झुंज देऊन हा गडी पुन्हा मैदानात खेळायला उतरला. थोडक्यात, इतकं घवघवीत यश मिळूनसुद्धा कारकीर्दीच्या अखेरच्या काळातही संघर्षाने त्याची पाठ सोडली नाहीच आणि युवराजही या सगळ्याला एका योद्ध्याप्रमाणेच खंबीरपणे, जराही न डगमगता सामोरा गेला, लढला आणि यशस्वी झाला.

त्याच्या प्रत्येक खेळीला एका योद्ध्याचा टच असायचा. त्याचा दुर्दम्य आत्मविश्वास त्याच्या चेहऱ्यावर दिसून यायचा. डोळ्यांत तर आगच असायची म्हणा. ती आग बॅटमध्ये उतरली की समोरचा पोळलाच म्हणून समजा. २००७ मध्ये इंग्लंडविरूद्ध त्याने चोपलेल्या सलग सहा षटकारांमुळे स्टुअर्ट ब्रॉड पोळून निघाला असेल. त्याचे ते लेगसाईडला हाणलेले उत्तुंग षटकार केवळ आ वासून बघत रहावेत अशा नजाकतीचे असायचे. फिल्डवरही युवराज जर कव्हर किंवा पॉईंटला असेल तर मग बॅट्समन एका जागी बांधून ठेवल्यासारखा होऊन जायचा.

आज आपल्या क्रिकेट संघाचं जे इतकं देखणं क्षेत्ररक्षण बघायला मिळतंय त्याची बीजं कैफ आणि युवराजने रूजवली आहेत, हे लक्षात घ्यायला हवं. त्याची कसोटी कारकीर्द कधीच फारशी लक्षवेधी ठरली नाही. पण २०११ चा एकदिवसीय विश्वचषक हा युवराजच्या कारकीर्दीतील सर्वोच्च बिंदू. तितकाच भावनिकसुद्धा. पुढे मग कर्करोगाशी लढा, मग संघात स्थान मिळवण्यासाठी, धावांसाठी धडपडणं वगैरे गोष्टी कारकिर्दीचा उतार दाखवणाऱ्या. त्यानंतर आज जाहीर केलेली निवृत्ती.

गेली तीन-चार वर्षं युवराज मैदानावरील कामगिरीसाठी फारसा चर्चेत नाही. गेली दोन वर्षं तर तो भारतीय संघातच नव्हता. कोहलीच्या नेतृत्वात खेळणारा भारतीय संघ रोज नव्याने वेगवेगळे विक्रम करत असताना, इकडे युवराजच्या अचानक निवृत्तीने चटका लागावा, यातंच सारं काही आलं.

सचिन, गांगुली, द्रविड बाद झाले की टीव्ही बंद करायचा, ही सवय मोडायला लावली ती युवराजने. कारण तो सतत लढत राहिला. पाचव्या, सहाव्या स्थानावर खेळणारा फलंदाज मॅच फिरवू शकतो, आणि आपण जिंकू शकतो, हा आत्मविश्वास त्याने दिला. तेंडुलकर, गांगुली, द्रविड, सेहवाग, लक्ष्मण, कुंबळे यांच्या बरोबरीने आमचं बालपण समृद्ध करण्यात युवराजचा मोठा वाटा आहे. आता आमचं बालपणही संपलंय आणि युवराजही निवृत्त झालाय. तरीही, जिद्दीने लढायचं कसं, हे शिकवणारा क्रिकेटच्या मैदानावरील एक योद्धा म्हणून ‘युवराज सिंग’ कायम स्मरणात राहील, हे निश्चित.

क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.

महत्त्वाच्या बातम्या –

युवराज पाठोपाठ हे पाच खेळाडूही घेऊ शकतात निवृत्ती

…आणि युवराजचे ते स्वप्न अधूरेच राहिले!

निवृत्तीपेक्षाही मोठी बातमी, युवराज सिंगने घेतला मोठा निर्णय