तरच युवराज आणि रैनाला मिळणार भारतीय संघात स्थान !

रवी शास्त्री: युवराज सिंग आणि सुरेश रैनासाठी भारतीय संघाचे दार खुले आहे.

भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक असलेल्या रवी शास्त्री यांनी नुकत्याच झालेल्या एका मुलाखतीत सांगितले की, युवराज सिंग आणि सुरेश रैना यांच्यासाठी भारतीय संघाचे दार अजूनही खुले आहे.

सुरेश रैनाने आपला शेवटचा वनडे सामना २०१५ मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळला होता, त्यानंतर तो आतापर्यंत संघाबाहेरच आहे. त्यानंतर त्याला फक्त टी -२० साठीच भारतीय संघात निवडले गेले होते. यावर्षीच्या सुरुवातीला इंग्लंड विरुद्ध झालेल्या टी२०वेळी तो भारतीय संघात होता.

दुसऱ्या बाजूला युवराज सिंगने या वर्षाच्या सुरुवातीला इंग्लंड विरुद्धच्या मालिकेत भारतीय संघात पुनरागमन केले होते. त्या मालिकेतील कट्टकच्या सामन्यात त्याने १७५ धावा केल्या होत्या पण त्यानंतर त्याच्या फॉर्ममध्ये चढ उतार आले. युवराजची वनडेमधील मागील चांगली कामगिरी म्हणजे पाकिस्तान विरुद्ध चॅम्पियन्स ट्रॉफीमधील अर्धशतक.

श्रीलंकेच्या मालिकेपूर्वी एनसीए बेंगळुरू येथे सुरेश रैना आणि युवराज सिंग हे दोघेही ‘यो-यो’ चाचणीत फेल झाले होते. या चाचणीत भारतीय संघाच्या प्रत्येक खेळाडूची सरासरी गुण १९.०५ च्या वर आहे, ज्यात सर्वात वर मनिष पांडे व विराट कोहली आहेत. युवराज व रैना दोघांनीही या चाचणीत सरासरीपेक्षा ही कमी गुण मिळवले आहेत.

“कोणतीही खेळाडू निवडण्यासाठी पात्र आहे जर तो फिटनेस, चालू फॉर्म आणि क्षेत्ररक्षण या गोष्टीत सक्षम असेल . संघाला सातत्याने विजय मिळवायचा असल्यास क्षेत्ररक्षणाची भूमिका अतिशय महत्त्वाची आहे. मी निवड प्रक्रियेत सहभागी नाही पण युवराज सिंग व सुरेश रैना यांच्यासाठी संघाचे दार बंद नाही. या तीन विभागात चांगले प्रदर्शन करणारा कोणताही खेळाडू निवडीसाठी पात्र आहे.”

२०१९ विश्वचषकाच्या संघ निवडीसाठी वापरल्या जाणाऱ्या रोटेशन पोलीसीबद्दल बोलताना शास्त्री म्हणाले, “२०१९ च्या एकदिवसीय विश्वचषकाचा विचार करता, आम्ही प्रत्येक खेळाडूला श्रीलंकेत खेळण्याची संधी देण्याचा प्रयत्न केला. ऑस्ट्रेलियाविरूद्धची मालिका विश्वचषक स्पर्धेसाठी कोर संघ तयार करण्यासाठी उपयुक्त ठरेल.”