आजी माजी खेळाडूंनी दिल्या युवराजला वाढदिवसाच्या शुभेच्छा

भारतीय संघातील लढवय्या खेळाडू युवराज सिंगचा आज ३६ वा वाढदिवस आहे. या निमित्त त्याला अनेक आजी माजी खेळाडूंनी शुभेच्छा दिल्या आहेत.

युवराज २०११ च्या विश्वचषकाचा शिल्पकार म्हणून ओळखला जातो. तसेच त्याचे २००७ च्या पहिल्याच टी २० विश्वचषकातील एकाच षटकात इंग्लंड विरुद्ध स्टुअर्ट ब्रॉड च्या गोलंदाजीवर मारलेले ६ षटकार अजूनही सर्वांच्या लक्षात आहेत.

युवराज हा मोठ्या स्पर्धेचा खेळाडू म्हणून ओळखला जातो आणि हे त्याने प्रत्येक वेळेस दाखवून दिले आहे. त्याचे भारतीय संघातील पदार्पणसुद्धा २०००सालच्या चॅम्पिअन्स ट्रॉफीत झाले होते.

२०११ च्या विश्वचषकानंतर युवराजला कॅन्सर सारख्या मोठ्या आजाराने ग्रासले होते. या आजारावर उपचार करून त्याने पुन्हा एकदा क्रिकेटमध्ये पुनरागमन केले होते. त्यामुळे त्याने कॅन्सर सारख्या आजारावर अनेक उपक्रमही घेतले आहेत. त्याच्या याच लढ्याविषयी सर्वांनी कौतुक करत त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.