झी महाराष्ट्र कुस्ती दंगलचा ग्रँड लाँच आज, मान्यवरांच्या उपस्थितीत रंगणार झगमगता सोहळा

महाराष्ट्र आणि कुस्ती यांचे नाते अतूट आहे. खाशाबा जाधव, मामासाहेब मोहोळ, हरिश्चंद्र बिराजदार, मारुती माने या आणि अशा मराठमोळ्या कुस्तीवीरांनी महाराष्ट्राचे नाव उंचावले आहे. हीच परंपरा आजचे तरुण कुस्तीगीर पुढे नेत जगभरात भारताचा झेंडा फडकावत आहेत. याच कारणास्तव झी समूहाने कुस्ती या खेळाला एक अभूतपूर्व व्यासपीठ देण्याचे योजले आहे. झी महाराष्ट्र कुस्ती दंगल या क्रीडाविश्वातील भव्य सोहळ्याची आज म्हणजेच २ नोव्हेंबरपासून सुरुवात होत आहे. मराठी इंडस्ट्रीतील झगमगत्या तारे-तारकांसह इतर अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत हा ग्रँड लाँचचा सोहळा आज पुण्याच्या बालेवाडी स्टेडियममध्ये रंगणार आहे. महाराष्ट्रात अशा पद्धतीच्या इव्हेन्टचे आयोजन करणारी झी टॉकीज ही पहिली वाहिनी आहे.

झी महाराष्ट्र कुस्ती दंगल या शोच्या फॉरमॅटमध्ये राज्य, राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावरील महिला व पुरुष कुस्ती चॅम्पियन्स एकमेकांसोबत भिडताना दिसतील. वीर मराठवाडा, कोल्हापुरी मावळे, विदर्भाचे वाघ, यशवंत सातारा, पुणेरी उस्ताद आणि मुंबई अस्त्र अशा सहा संघांतर्फे हे कुस्तीगीर खेळणार आहेत. हे सर्व सामने श्री शिव छत्रपती स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स म्हणजेच पुण्याच्या बालेवाडी स्टेडियममध्ये रंगणार आहेत. श्री शरद पवार (अध्यक्ष, महाराष्ट्र कुस्तीगीर परिषद), श्री अजित गोएन्का (सीइओ, इंटरनॅशनल ब्रॉडकास्ट बिझनेस झी समूह) यांसह सिनेसृष्टीतील आकाश ठोसर, गश्मीर महाजनी, मानसी नाईक, दीपाली सय्यद, मंगेश देसाई, तेजश्री प्रधान, छाया कदम, संतोष जुवेकर आणि इतर यांच्या उपस्थितीत धमाल-मस्ती, नाच-गाण्यासह या कुस्ती महासंग्रामाच्या उद्घाटनाचा दिमाखदार सोहळा पार पडणार आहे.

झी महाराष्ट्र कुस्ती दंगल हा कुस्तीचा महासंग्राम २ नोव्हेंबरपासून सुरु होणार असून फक्त आणि फक्त झी टॉकीजवर लाइव्ह बघता येणार आहे. तसेच कुस्तीचा हा नवा वैभवकाळ देही याची डोळा अनुभवायचा असल्यास paytm आणि insider.in वरून सर्व सामन्यांची तिकिटे ऑनलाइन बूक करता येतील. तसेच बालेवाडी स्टेडियमवरही तिकिटांची काऊंटर्स आहेत.

कुस्तीचे खास ब्रँड अँबेसेडर्स
सर्व संघांना प्रमोट करण्यासाठी कुस्तीविश्वातील दिग्गज खास ब्रँड अँबेसेडर्स म्हणून नेमण्यात आले आहेत. पै. दत्तात्रय गायकवाड हे कोल्हापुरी मावळे या संघाचे ब्रँड अँबेसेडर आहेत. पै.अभिजित कटके हा यशवंत सातारा संघाचा ब्रँड अँबेसेडर आहे. पै.नरसिंग यादव याने मुंबई अस्त्रचे ब्रँड अँबेसेडरपद स्वीकारले आहे. पै.सईद चाऊस हे वीर मराठवाडाचे ब्रँड अँबेसेडर आहेत. पुणेरी उस्तादच्या संघाचे ब्रँड अँबेसेडर पै. विजय बनकर आहेत.

महत्त्वाच्या बातम्या:

आज कॅप्टन कूल धोनी खेळतोय शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना !

गतविजेते मुंबई उपनगर व पुणे संघाची विजयी सलामी, जाणून घ्या पहिल्या दिवसाचे निकाल

ISL 2018: बेंगळुरूचा एटीकेवर पिछाडीवरून विजय

भारत विरुद्ध विंडीजमध्ये होणाऱ्या शेवटच्या वनडेत या विक्रमांकडे नक्की लक्ष ठेवा