भारत विरुद्ध बांगलादेश यांच्यातील कसोटी मालिकेतील दुसरा सामना 27 सप्टेंबरपासून कानपूरमध्ये खेळवला जाणार आहे. पहिल्या सामन्यात भारताने बांगलादेशचा 280 धावांनी पराभव करत 1-0 ने आघाडी घेतली आहे. टीम इंडिया आता दुसरा सामना जिंकून मालिकेत क्लिन स्वीप करण्याच्या तयारीत आहे, तर बांगलादेश हा सामना जिंकून मालिकेत बरोबरी साधण्याच्या निर्धाराने मैदानात उतरणार आहे.
दरम्यान, बांगलादेशचा अनुभवी ऑलराउंडर शाकिब अल हसन याच्या खेळण्याबाबत उत्सुकता होती, कारण पहिल्या सामन्यात त्याच्या बोटाला झालेल्या दुखापतीमुळे त्याने फार बॉलिंग केली नव्हती. चेन्नई कसोटीत जसप्रीत बुमराहच्या बॉलिंगवर त्याला बॅटिंग करताना दुखापत झाली होती. या दुखापतीनंतर त्याला जास्त बॉलिंग करणे टाळण्यात आले, परंतु तरीही त्याने 21 ओव्हर टाकल्या होत्या.
शाकिबच्या दुसऱ्या सामन्यात खेळण्याबाबतची उत्सुकता वाढली होती. यावर बांगलादेशच्या हेड कोच चंडिका हाथुरुसिंघे यांनी स्पष्टता दिली आहे. त्यांनी सांगितले की, शाकिब दुसऱ्या सामन्यात खेळणार आहे. या बातमीमुळे सर्व चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे.
बांगलादेश क्रिकेट बोर्डाचे निवड समितीचे सदस्य हन्नान सरकार यांनी दिलेल्या माहितीनुसार, शाकिबच्या सामन्यात खेळण्याचा अंतिम निर्णय कानपूरमधील सराव सत्रानंतर घेण्यात येणार होता. तथापि, आता हेड कोचने दिलेल्या माहितीनुसार, शाकिब खेळण्यास तयार आहे.
पहिल्या सामन्यात शाकिबला त्याच्या लौकीकाला साजेशी कामगिरी करता आली नव्हती, त्यामुळे दुसऱ्या सामन्यात तो कशी कामगिरी करतो, याकडे क्रिकेट चाहत्यांचे लक्ष लागले आहे. भारतीय गोलंदाजांचा सामना करताना शाकिबची कामगिरी बांगलादेशला विजय मिळवून देण्यासाठी निर्णायक ठरू शकते